बार कौन्सिल निवडणूक : ॲड. प्रमोद भोकरे यांना राज्यभरातून वाढता पाठिंबा
सांगली : महाराष्ट्र–गोवा बार कौन्सिल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिलच्या कार्यक्षमतेचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, या पार्श्वभूमीवर सांगलीचे ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांना राज्यातील विविध प्रमुख वकील संघटनांकडून जाहीर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बार कौन्सिलची मुख्य कार्ये म्हणून वकिलांना अधिकृत यादीत समाविष्ट करणे, वकिलांचा रोल तयार करून त्याची देखभाल करणे, वकिलांविरोधातील गैरवर्तन प्रकरणांची चौकशी व त्यावर निर्णय देणे, तसेच वकिलांचे हक्क, विशेषाधिकार व हितसंबंधांचे संरक्षण करणे यांचा समावेश होतो. यासोबतच कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बार असोसिएशनच्या बळकटीकरणासाठी प्रोत्साहन, कायदा सुधारणांना पाठिंबा, कायदेशीर शिक्षणाचा प्रसार व समाजातील गरीब घटकांसाठी कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे ही जबाबदारीही बार कौन्सिलवर आहे.
ॲड. प्रमोद भोकरे यांनी आपल्या प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठात रूपांतर, जुनिअर वकिलांसाठी स्टायफंड सुरू करणे, तसेच देशात प्रथमच जुनिअर वकिलांसाठी स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा ठोस अजेंडा मांडला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विशेषतः तरुण वकिलांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.
सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, स्वच्छ व निष्कलंक प्रतिमा, चारित्र्य, सद्भावना आणि न्यायाप्रती तळमळ असलेले नेतृत्व म्हणून ॲड. भोकरे यांची ओळख आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वकील संघटनांकडून त्यांना पाठिंबा जाहीर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
कायद्याच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, भोकरे यांची रणनिती आणि व्यापक दृष्टिकोन पाहता सदर निवडणूक अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी, न्याय विश्व साप्ताहिक
Post a Comment
0Comments