ज्येष्ठ विधिज्ञ हाजी शाह आजिज शेख यांचे निधन
जतच्या विधी क्षेत्रातील अनुभवी पर्व काळाच्या पडद्याआड; सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आयुष्यभर योगदान
जत, प्रतिनिधी : जतच्या विधी क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कायद्यावरील सखोल प्रभुत्वाचा आणि प्रभावी वकिलीचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ विधिज्ञ हाजी शाह आजिज शेख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जतच्या विधी क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
जत वकील संघटनेचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनी अनेक दशकांच्या वकिली कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः दिवाणी कायद्यातील त्यांचा गाढा अभ्यास, न्यायालयातील प्रभावी युक्तिवाद आणि कायद्याच्या विविध पैलूंवरील प्रभुत्व यांमुळे त्यांनी विधी क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण केले होते.
सामान्य माणसाच्या न्यायासाठी प्रभावी भूमिका!
वकिली हा केवळ व्यवसाय नसून न्याय मिळवून देण्याचे माध्यम आहे, या भूमिकेतून त्यांनी तळागाळातील नागरिकांसाठी मोलाचे कार्य केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्यायालयीन पातळीवर सक्षमपणे मांडणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे आणि आपल्या अनुभवाच्या बळावर न्यायासाठी लढा देणे, ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये होती. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द आणि कायद्याप्रती असलेली निष्ठा नवोदित वकिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
अनुभवी मार्गदर्शक हरपल्याने विधी क्षेत्रात हळहळ
हाजी शाह आजिज शेख यांच्या निधनाने जतच्या वकील वर्गाने एक ज्येष्ठ सहकारी, अनुभवी विधिज्ञ आणि मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यांनी जपलेली व्यावसायिक प्रतिष्ठा दीर्घकाळ स्मरणात राहील.
ते ॲड. ताहीर शेख यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अल्लाह तआला मरहूम यांची मगफिरत फरमावो, त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये उच्च स्थान प्रदान करो आणि शोकाकुल कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
— न्याय विश्व साप्ताहिक, सांगली
Post a Comment
0Comments