पुणेकरांच्या हातात आता ‘तिसरा डोळा’!
वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पुणे वाहतूक पोलिसांचे PTP App चे नवे व्हर्जन लाँच
पुणे | विशेष प्रतिनिधी
पुणे शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. ‘PTP App’ (Pune Traffic Police App) चे अद्ययावत व्हर्जन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागरिकही थेट नजर ठेवू शकणार आहेत.
नागरिकच बनणार पोलिसांचा ‘तिसरा डोळा’!
शहरातील प्रत्येक चौकात किंवा रस्त्यावर पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य नसते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात नागरिकांच्या सहभागातून कारवाई करण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे, ट्रिपल सीट प्रवास करणे यांसारखे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिक संबंधित वाहनाचा फोटो किंवा व्हिडिओ आणि स्पष्ट नंबर प्लेटसह ॲपद्वारे तक्रार नोंदवू शकणार आहेत.
PTP App मध्ये काय सुविधा?
Report Violation:
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनाचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करून पोलिसांकडे तक्रार करता येणार.
🔹 My Vehicles & E-Challans:
स्वतःच्या वाहनावर प्रलंबित असलेले ई-चलन व दंडाची माहिती तपासता येणार.
🔹 Grievance Redressal:
चुकीचे ई-चलन किंवा वाहतुकीशी संबंधित समस्येबाबत ॲपमधून तक्रार व दाद मागता येणार.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना इशारा!
तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांचा सहभाग वाढल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘पोलिसांच्या नजरेतून सुटलो म्हणजे कारवाईपासून सुटलो’ हा समज आता बदलण्याची वेळ आली आहे.
नागरिकांच्या हातातील कॅमेरा आणि पोलिसांचे PTP App यांचा संगम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी कितपत प्रभावी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
न्याय विश्व साप्ताहिक
Post a Comment
0Comments