*७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘न्याय विश्व’ साप्ताहिकाचे भव्य अनावरण*
सांगली | प्रतिनिधी
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मराठी भाषेत कायद्याची माहिती, आकलन व कायदा साक्षरता पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारमान्य व नोंदणीकृत “न्याय विश्व” या साप्ताहिकाचे अनावरण सांगली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश मा. श्री. न. के. ब्रह्मे, जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. वि. दे. निबांळकर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. सु. रा. पडवळ, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. दि. य. गौड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष मा. ॲड. अशोकराव वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील मा. ॲड. प्रमोद भोकरे, माजी अध्यक्ष मा. ॲड. भाऊसाहेब पवार, मा. ॲड. सुरेश भोसले यांच्यासह सांगली जिल्हा वकील संघटनेतील अनेक ज्येष्ठ विधिज्ञ, वकील बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवर न्यायाधीशांनी कायदा साक्षरतेचे महत्व अधोरेखित करत ‘न्याय विश्व’सारखे साप्ताहिक सामान्य नागरिकांना कायद्याबाबत जागरूक करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मराठी भाषेत सोप्या पद्धतीने कायद्याची माहिती देण्याचा हा उपक्रम लोकाभिमुख असून समाजात कायद्याबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “न्याय विश्व” साप्ताहिकास शुभेच्छा देत या उपक्रमास सदैव पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन, शुभेच्छा व प्रेरणा देणाऱ्या सर्व मान्यवर न्यायाधीश, वकील संघटनेचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकील, ज्येष्ठ वकील, सहकारी व उपस्थित मान्यवरांचे “न्याय विश्व” परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कायदा साक्षरतेच्या या लोकाभिमुख उपक्रमास सर्वांचे सहकार्य लाभल्यास निश्चितच समाजात न्यायजागृतीची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
Post a Comment
0Comments