सांगली जिल्हा बार असोसिएशन निवडणूक: ऐतिहासिक परंपरेच्या संघटनेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चुरशीच्या लढतीत 'गुलाल' उधळला!
सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्रभरात आपल्या गौरवशाली इतिहासामुळे आणि नावलौकिकामुळे प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्हा बार असोसिएशनची सन २०२६-२७ ची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. राज्यातील अनेक दिग्गज विधीतज्ज्ञ या संघटनेने दिले असून, या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा असतानाही वकील बांधवांनी दाखवलेला उत्साह आणि मतदानासाठी लावलेल्या रांगा या निवडणुकीची व्याप्ती स्पष्ट करणाऱ्या ठरल्या.
मतदानाची आकडेवारी आणि उत्साह
यावर्षीच्या निवडणुकीत ६४१ पात्र मतदारांपैकी ५६९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर वकील बांधवांनी गर्दी केली होती.
"ॲड. चंद्रकांत माने: सांगली वकील संघटनेचे नवे सारथी; जल्लोषात गुलालाची उधळण!"
वाढत्या तापमानाची तमा न बाळगता लोकशाहीच्या या उत्सवात वकीलांनी सहभाग नोंदवला. ही निवडणूक केवळ पदासाठी नसून संघटनेच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसून आले होते.
निवडणुकीचा सविस्तर निकाल
अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत माने यांचा विजय
अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत ॲड. चंद्रकांत दत्ताजीराव माने यांनी ३१६ मते मिळवून बाजी मारली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा ७८ मतांनी पराभव करत अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
प्रमुख पदाधिकारी:
- उपाध्यक्ष: ॲड. महाजन गजानन (३४० मते) - १७६ मतांच्या फरकाने विजयी.
- सेक्रेटरी: ॲड. माळी चंद्रकांत (३६३ मते) - १६४ मतांच्या फरकाने विजयी.
- सह-सेक्रेटरी (पुरुष): ॲड. तेग्गी माणिक (२५९ मते) - ६९ मतांनी विजयी.
कार्यकारिणी सदस्य: 'काटे की टक्कर'
सदस्य (पुरुष विभाग):
१. ॲड. सचिन गायकवाड (४२८ मते)
२. कदम विनायक (४०२ मते)
३. देशमुख विक्रांत (३९२ मते)
४. महादेव पाटील (३६२ मते)
५. कुलकर्णी एम. एम. (३३८ मते)
६. कोणार्क पाटील (३२७ मते)
सदस्या (महिला विभाग):
१. ॲड. जामदार भाग्यश्री (३८९ मते)
२. ॲड. मिरजे प्रणाली (३७४ मते)
३. ॲड. सिमा सुतार (३५३ मते)
४. ॲड. कराडे अंकिता (३५० मते)
एक मताचा फरक अन फिर-मोजणीचा पेच!
या निवडणुकीत पुरुष सदस्य गटात सर्वाधिक नाट्य पाहायला मिळाले. उमेदवार कोणार्क पाटील यांनी ३२७ मते मिळवून विजय संपादन केला, परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी अभिजीत बसू गडे यांच्यापेक्षा त्यांचे मताधिक्य केवळ 'एक' असल्याने निवडणूक निकालात मोठी उत्कंठा निर्माण झाली.
अभिजीत बसुगडे यांनी या निसटत्या पराभवानंतर तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 'फेर 'मोजणी'साठी अर्ज दाखल केला. निवडणूक कमिटीने हा तक्रार अर्ज दखलपात्र ठरवून पुन्हा मोजणी करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे या एका जागेचा निकाल सध्या तरी चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
विजयाचा जल्लोष
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सांगलीच्या वकील संघटनेची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी आणि वकील बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ही नूतन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास नूतन अध्यक्षांनी व्यक्त केला.
- न्याय विश्व साप्ताहिक, विशेष वार्तांकन
Post a Comment
0Comments