सांगली | प्रतिनिधी
गरजूंसाठी न्यायाचा सेतू मजबूत होणार
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्याकडून सन २०२६ ते २०२९ याकालावधीसाठी नवीन पॅनल ॲडव्होकेट्सच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मोफत व सक्षम विधी सेवा) नियमावली २०१० मधील नियम ८ अन्वये, किमान ३ वर्षांचा वकिलीचा अनुभव असलेल्या पात्र वकिलांना या पॅनलवर काम करण्याची संधी मिळणार आहे. पॅनल वकिलांमार्फत गरजू व दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा देण्यात येते.
अर्ज साध्या कागदावर टाईप/कॉम्प्युटर प्रिंट स्वरूपात सादर करावयाचा असून, त्यासोबत व्यावसायिक अनुभवाचा पुरावा, हाताळण्यास इच्छुक असलेल्या प्रकरणांचा प्रकार, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनलवर कार्यरत असलेल्या वकिलांनाही नवीन पॅनलसाठी पुनः अर्ज करणे अनिवार्य आहे.
अर्ज २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, कोणत्याही कार्यदिवशी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पॅनल वकिलांसाठी अटी
नवीन पॅनलचा कालावधी तीन वर्षांचा राहणार असून, पॅनल वकिलांविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा प्रलंबित नसावा. लाभार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची फी घेण्यास मनाई असून, नियमित अहवाल सादर करणे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.
पॅनल ॲडव्होकेट्सना मानधन अधिकृत शुल्क वेळापत्रकानुसार दिले जाणार असून, कामगिरी असमाधानकारक आढळल्यास पॅनलमधून नाव वगळण्याचा अधिकार प्राधिकरणास राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
Post a Comment
0Comments