📰 न्याय विश्व : विशेष वृत्त
सांगली न्यायालय पार्किंगमधील आग; “नशीब बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना” — प्रशासनावर कठोर सवाल
सांगली : सांगली न्यायालयाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडलेली आग ही केवळ अपघात म्हणून झटकून टाकण्यासारखी नसून, प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे धक्कादायक उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
घटनेच्या वेळी न्यायालयाच्या वरच्या मजल्यांवर नियमित कामकाज सुरू होते. अनेक न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचारी न्यायदानाच्या प्रक्रियेत व्यस्त असताना खाली पार्किंगमध्ये दुचाकीला आग लागली. ही घटना न्यायालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.
या इमारतीच्या उभारणीसाठी व आतील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुरक्षायंत्रणाच निष्क्रिय असल्याचे या घटनेतून उघड झाले. फायर सिस्टीम असूनही ती कार्यरत नसणे ही केवळ चूक नसून थेट बेपर्वाई असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागलेले वाहन उभे होते ते पार्किंगच्या एका कोपऱ्यात असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य तात्काळ लक्षात आले नाही. मात्र हाच प्रकार लिफ्टजवळ किंवा न्यायाधीश व वकिलांच्या वाहनांच्या पार्किंग परिसरात घडला असता, तर परिणाम किती भीषण झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
या पार्श्वभूमीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बार सदस्य व नागरिकांनी प्रशासनाला थेट अनेक प्रश्न विचारात आहेत.
फायर सिस्टीम कार्यरत का नव्हती?
आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा कितपत सक्षम आहे?
“आज नशीब साथ देत असल्याने दुर्घटना टळली; पण उद्या अशीच घटना जीवितहानी घडवून आणली, तर जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर जनमानसात चिंतेचा सूर उमटला असून, भविष्यात अशा घटना घडल्यास प्रशासनाची यंत्रणा किती तत्परतेने प्रतिसाद देईल याबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे.
सामान्य जनतेचा प्रशासनाला ठाम सवाल:
न्यायदान करणारी यंत्रणा ज्या इमारतीत कार्यरत आहे, तीच इमारत सुरक्षित नसेल तर हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे.
प्रशासनाने यावर तात्काळ ठोस पावले उचलून सुरक्षायंत्रणा कार्यान्वित करावी, अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होणे अटळ ठरणार आहे.
Post a Comment
0Comments