सांगोला घटनेने संतापाचा स्फोट; अॅड. प्रमोद भोकरे यांचा इशारा – “आता थांबणार नाही, राज्यभर महामेळा!”
सांगली/सोलापूर (प्रतिनिधी):
सांगोला येथे वकिलावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने केवळ एक प्रकरण राहिले नसून, संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर घाला घालणारी घटना ठरली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील जेष्ठ विधीज्ञ व प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद भोकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“ही घटना फक्त निषेधार्ह नाही, तर वकिलांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा कट असल्याचे स्पष्ट दिसत आहे,” असे ठणकावून सांगत अॅड. भोकरे यांनी प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केला. “समाजातील प्रतिष्ठित घटक असलेल्या वकिलांना बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रकार घडवले जात आहेत. आता वकील वर्ग गप्प बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि इतर तालुक्यांतील वकील संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारत न्यायालयीन कामकाज ठप्प केले आहे. या आंदोलनाचे पडसाद सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उमटत असून, वातावरण तापले आहे.
अॅड. भोकरे यांनी पुढे स्पष्ट केले, “संपूर्ण महाराष्ट्रात महामेळावे घेऊन वकील एकजूट दाखवतील. पुन्हा अशा घटना घडल्यास त्याला तीव्र आणि निर्णायक उत्तर दिले जाईल.”
वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठीही त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. “उच्चस्तरीय समिती नेमून कायद्याच्या मसुद्यात आवश्यक बदल करून, पक्षकार, पोलीस व इतर घटकांना समाविष्ट करून कठोर शिक्षेच्या तरतुदीसह हा कायदा तात्काळ मंजूर करावा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेने सोलापूर-सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून, वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Post a Comment
0Comments