वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची आक्रमक मागणी; सोलापूर-सांगलीसह संपूर्ण विभागाचे लक्ष खिळले
सांगोला/पंढरपूर/मंगळवेढा (प्रतिनिधी):
सांगोला पोलीस ठाण्यात वकिलावर झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उमटू लागले असून, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तसेच इतर तालुक्यांतील वकील संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या घटनेमुळे वकील वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत असून, न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१/०३/२०२६ रोजी रात्री सुमारास अॅड. मेटकरी यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून अपमानित केले. अॅड. मेटकरी यांनी आपण वकील असल्याचे सांगून विचारणा केली असता, त्यांना कथितरित्या मारहाण करण्यात आली, तसेच काही वेळ पोलीस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले होते.
सदर घटनेच्या निषेधार्थ विविध बार असोसिएशननी तातडीच्या बैठका घेत, न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. वकिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर “वकील संरक्षण कायदा” तात्काळ लागू करावा, अशी आक्रमक मागणी सर्व स्तरातून पुढे येत आहे.
वकील संघटनांनी दिलेल्या निवेदनांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, न्यायप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांवर अशा प्रकारे होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून, हे प्रकार थांबवण्यासाठी ठोस कायदेशीर संरक्षण गरजेचे आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचे पडसाद सोलापूरसह सांगली जिल्ह्यातही उमटले असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Post a Comment
0Comments