🚨 ब्रेकिंग न्यूज | न्याय विश्व साप्ताहिक 🚨
"५९ मतांनी पराभव, पण लाखमोलाचे प्रेम जिंकले; बार कौन्सिल निवडणुकीतील पारदर्शकतेवर ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांचा सवाल"
मुंबई | न्याय विश्व साप्ताहिक प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ५९ मतांच्या अत्यंत निसटत्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांनी न्याय विश्व साप्ताहिकशी संवाद साधताना संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकील बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. निवडणुकीतील पराभव स्वीकारत त्यांनी वकील समाजाने दिलेल्या विश्वासाला आपली सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे सांगितले.
“माझ्यावर विश्वास ठेवून हजारो वकील बांधवांनी दिलेली मते आणि व्यक्त केलेले प्रेम हे कोणत्याही विजयापेक्षा कमी नाही. वेळेच्या मर्यादेमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता आले नाही, ही खंत कायम राहील. मात्र सर्वांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळेच मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो,” अशा शब्दांत ॲड. भोकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी त्यांनी बार कौन्सिलच्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या मते, अनेक वकील सभासद तसेच उमेदवारांच्या मनात मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
“मतांचे हस्तांतरण (Transfer of Votes) नेमके कशा पद्धतीने होते, त्याचा गणिती आधार काय आहे, प्रत्येक टप्प्यातील आकडेवारी कशी निश्चित केली जाते, याबाबत अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. प्रत्येक हिशोबाचा ताळमेळ आणि गुणोत्तर पारदर्शक पद्धतीने मांडले गेले तर निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास आणखी दृढ होईल,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
बार कौन्सिलसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या निवडणुकीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता ही लोकशाहीची मूलभूत तत्त्वे अधिक बळकट व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भविष्यात या विषयावर सकारात्मक चर्चा होण्याची गरजही मांडली.
शेवटी, निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ देणारे सर्व वकील बांधव, समर्थक, सहकारी आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार मानत, “हा पराभव नसून भविष्यातील अधिक व्यापक कार्याची नवी सुरुवात आहे,” असा आशावादी संदेश ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांनी दिला.
न्याय विश्व साप्ताहिक | विशेष
Post a Comment
0Comments