📰 न्याय विश्व साप्ताहिक
दुसऱ्यांच्या न्यायासाठी आयुष्य वेचणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी...!
सांगली :विशेष वृत्त १८ जुलै २०२६
न्यायासाठी लढणारा वकील हा समाजाचा आधारस्तंभ असतो. पीडित, वंचित आणि अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी न्यायालयात दिवस-रात्र झटणारा हा लढवय्या अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. "ही केस संपली की थोडी विश्रांती घेऊ," असे मनाशी ठरवणाऱ्या वकिलासमोर तेवढ्यात दुसरी केस उभी ठाकते आणि या अखंड धावपळीत स्वतःच्या शरीराची हाक अनेकदा ऐकूच येत नाही.
लोकांचे प्रश्न, पक्षकारांची अपेक्षा, न्यायालयीन कामकाज, घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक अनिश्चितता या सर्वांचा ताण पेलताना अनेक वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी हायपरटेन्शन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि बैठ्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांना बळी पडतात. वेळेत तपासणी व उपचार न झाल्याने अनेक वकील बांधवांचे अकाली निधन झाल्याची वेदनादायी उदाहरणेही समाजाने अनुभवली आहेत.
याच पार्श्वभूमीवर सांगली वकील संघटनेने वकील बांधव आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथे मोफत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणीपुरता मर्यादित न राहता, वकील कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी संघटना मनापासून स्वीकारत असल्याचा जिव्हाळ्याचा संदेश देणारा ठरला.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. सौ. अदिती उदय कदम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. श्री. जी. जी. कांबळे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश मा. श्रीमती एस. जे. घरतसो तसेच इतर न्यायिक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत दत्ताजीराव माने, उपाध्यक्ष ॲड. गजानन आण्णाप्पा महाजन, सचिव ॲड. चंद्रकांत भिमाण्णा माळी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. मनिषा पाटील व श्री. अधिराज कुलकर्णी यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयविकार, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, न्यूरोलॉजी आदी विषयांवरील तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
विशेषतः डॉ. शमून खान यांनी "ताणतणावमुक्त जीवनशैली आणि मधुमेह नियंत्रण" या विषयावर केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. न्यायालयीन व्यवसायातील ताण कसा कमी करावा, नियमित तपासणीचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीची गरज त्यांनी प्रभावीपणे पटवून दिली.
शिबिरात मोठ्या संख्येने वकील बांधव व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली. अनेकांना प्राथमिक टप्प्यातच आरोग्यविषयक समस्या निदर्शनास आल्याने पुढील उपचारासाठी योग्य दिशा मिळाली. त्यामुळे हा उपक्रम अनेकांसाठी "वेळेवर मिळालेला आरोग्याचा इशारा" ठरला.
कार्यक्रमानंतर न्यायालयीन परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले. "दुसऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांच्या आरोग्याचीही कुणीतरी काळजी घेत आहे," अशी भावना अनेक वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. सांगली वकील संघटनेने केवळ व्यावसायिक प्रश्नांपुरते मर्यादित न राहता, वकील बांधवांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी सातत्याने राबविलेल्या उपक्रमांमुळे संघटनेबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
'न्याय विश्व'चे मत...
न्याय मिळवून देणारा प्रत्येक हात निरोगी राहिला, तरच न्यायव्यवस्था अधिक सक्षम राहील. समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही केवळ संघटनेची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सांगली वकील संघटनेचा हा उपक्रम निश्चितच इतर वकील संघटनांसाठी प्रेरणादायी ठरेल.
सदर उपक्रमातील काही छायाचित्र...
Post a Comment
0Comments