सांगली (विशेष प्रतिनिधी): सांगली वकील संघटनेतील अत्यंत अभ्यासू, नम्र आणि महसूल न्यायालयातील कायदेशीर बाबींचे सखोल जाणकार म्हणून नावाजलेले ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अमोल चिमण्णा तसेच संघटनेतील आदरणीय ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अभिनंदन शेटे या दोन्ही मान्यवरांचा वाढदिवस सांगली वकील संघटनेच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कॉलेज जीवनापासूनच बुद्धिमत्ता, अभ्यासूवृत्ती आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ॲड. अमोल चिमण्णा यांनी वकील क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक कार्यातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वाढदिवसाच्या या संयुक्त औचित्याने आयोजित विशेष सोहळ्यात सांगली न्यायालयातील अनेक दिग्गज वकिलांनी उपस्थित राहून ॲड. अमोल चिमण्णा आणि ॲड. अभिनंदन शेटे या दोन्ही ज्येष्ठ विधीज्ञांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या भावी वाटचालीस उत्तुंग यश मिळो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ विधीज्ञांकडून गौरवोद्गार आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय व शुभेच्छा सत्रात बोलताना ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रदीप पोळ यांनी ॲड. अमोल चिमण्णा यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. "अमोल यांचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी आणि नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी आहे," असे सांगत त्यांनी ॲड. चिमण्णा व ॲड. अभिनंदन शेटे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाप्रसंगी सांगली वकील संघटनेतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीकांत जाधव यांनी सर्वप्रथम ॲड. अमोल चिमण्णा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ॲड. जाधव हे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी सदस्य असून सांगली वकील संघटनेच्या प्रगतीमध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. फौजदारी कायद्यातील महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध व निष्णात वकील म्हणून त्यांची ओळख असून उलटतपासणी आणि खटले चालवण्यात त्यांचे अफाट प्राबल्य आहे; महाराष्ट्रातील अनेक गाजलेल्या केसेस त्यांनी यशस्वीरीत्या चालवल्या आहेत.
आपल्या मनोगतातून ॲड. जाधव यांनी संघटनाप्रती असलेले प्रेम आणि सहकार्याची भावना व्यक्त केली. "सांगली वकील संघटना आणि जिल्ह्यातील जनतेला उत्तम व चांगल्या न्यायाची अपेक्षा आहे," असे नमूद करत त्यांनी यासंदर्भात अनेक महत्त्वाची धोरणे वकील संघटनेसमोर मांडली. वकील संघटनेतील अडचणी व समस्या सर्वांनी एकजुटीने सोडवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वकील संघटनाप्रती नेहमीच सकारात्मक भूमिका घेणाऱ्या ॲड. जाधव यांनी नुकतेच सांगली वकील संघटना परिसरात 'भारतीय संविधानाच्या' तैलचित्राचे अनावरण करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. याप्रसंगी त्यांनी संघटनेच्या हितासाठी अनेक प्रभावी सूचनाही मांडल्या.
तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महावीर गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून ॲड. चिमण्णा यांच्यासोबतच्या भूतकाळातील अनेक जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा दिला. "अमोल हे केवळ एक उत्तम वकील नसून इतरांची मनापासून काळजी घेणारे एक गुणी आणि हुंदा नेतृत्व आहे," अशा शब्दांत त्यांनी ॲड. चिमण्णा यांच्याविषयीचे जिव्हाळ्याचे नाते व्यक्त करत ॲड. अभिनंदन शेटे यांनाही स्नेहाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ॲड. अशोकराव वाघमोडे, ॲड. किरण राजपूत व ॲड. शीतल मदवण्णा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. अमोल चिमण्णा यांनी वकील संघटना आणि समाजासाठी केलेल्या कार्याप्रती त्यांनी मनापासून सद्भावना व्यक्त केली. त
सेच "येणाऱ्या काळात ॲड. अमोल चिमण्णा यांना आमचा कायम पाठिंबा व भक्कम पाठबळ राहील," अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
भावूक व रोखठोक मनोगतातून ॲड. अमोल चिमण्णांचे आत्मचिंतन
उपस्थितांच्या सत्कार आणि शुभेच्छांना उत्तर देताना ॲड. अमोल चिमण्णा भावूक झाले. त्यांनी सांगली वकील संघटनेचे मनापासून आभार मानत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अलीकडेच झालेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीच्या अनुभवांवर भाष्य करताना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले. "बार कौन्सिलच्या निवडणुकीत नियोजनात काही चुका झाल्या, अन्यथा सांगलीतील दोन्ही उमेदवार निवडून आले असते. परंतु, या चुकांमधून शिकून येणाऱ्या काळात अधिक ताकदीने आणि नियोजनाने निवडणुकीला सामोरे जाऊ," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणात वकील क्षेत्रातील सद्यस्थितीवर अत्यंत थेट आणि गंभीर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, "आज अनेक वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे." या गंभीर समस्येवर भविष्यात वकील संघटनेच्या माध्यमातून खंबीरपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. "मला संघटनेकडून पूर्वीपेक्षाही अधिक सहकार्य आणि प्रेमाची अपेक्षा आहे," असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी केले.
सभासदांमध्ये विशेष चर्चा आणि स्नेहाचे वातावरण
या संयुक्त वाढदिवस सोहळ्यास सांगली वकील संघटनेतील अनेक दिग्गज, ज्येष्ठ विधीज्ञ, पदाधिकारी आणि तरुण वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. अमोल चिमण्णा आणि ॲड. अभिनंदन शेटे यांच्या वाढदिवसाचा हा सोहळा केवळ औपचारिक न राहता वकील संघटनेतील बंधुभाव, एकता आणि भविष्यातील संघटित वाटचालीचा एक नवा अध्याय ठरावा, असा बनला. उपस्थितांच्या भरगच्च उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक ठरला असून संपूर्ण वकील वर्गात या कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली आहे.
कार्यक्रमाच्या अंती उपस्थितांसाठी स्नेहपूर्वक चहापानाचे नियोजन करण्यात आले होते.
(साप्ताहिक 'न्याय विश्व'साठी विशेष वृत्त)
Post a Comment
0Comments