करजगीतील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नरधमासा फाशीची शिक्षा!
जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता व तळमळीमुळे चिमुरडीला मिळाला न्याय; सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
विशेष वृत्त / सांगली :
जत तालुक्यातील करजगी येथे ४ वर्षे ३ महिने वयाच्या चिमुरड्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) सर्वोच्च शिक्षा सुनावली आहे. सांगलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ श्रीमंती जे. ए. मोहांती यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडताना जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी बजावलेली भूमिका अत्यंत प्रभावी व कौतुकास्पद ठरली आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
ही हृदयद्रावक घटना दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० च्या सुमारास घडली होती. करजगी (ता. जत, जि. सांगली) येथील अवघ्या ४ वर्षे ३ महिने वयाची पीडित बालिका तिच्या घराबाहेर एका ८ वर्षांच्या बालिकेसोबत खेळत होती. खेळत खेळत दोन्ही मुली आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी (वय- ४५ वर्षे, रा. करजगी) याच्या घरासमोरील बदामाच्या झाडाखाली गेल्या.
त्याच वेळी सोबत असलेल्या बालिकेला तिच्या आईने शाळेत जाण्यासाठी हाक मारल्याने ती निघून गेली. पीडित चिमुरडी बदामाच्या झाडाखाली एकटीच असल्याचे पाहून आरोपी पांडुरंग याने तिला फुस लावून आपल्या घरात नेले. तेथे तिच्यावर क्रूरपणे शारीरिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगांवर गंभीर इजा पोहोचवून तिचा खून केला. प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आरोपीने चिमुरडीचा मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता.
ॲड. प्रमोद भोकरे : सर्वसामान्यांप्रती तळमळ आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन
सदर प्रकरण हे पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर (Circumstantial Evidence) आधारित होते. अशा संवेदनशील प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी अतिशय प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजू मांडली. सर्वसामान्य आणि पीडित घटकांप्रती असणारी त्यांची तळमळ या खटल्यात स्पष्टपणे दिसून आली.
आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रगाढ अभ्यासाच्या जोरावर ॲड. भोकरे यांनी:
- सरकारी पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदारांची अत्यंत बारकाईने तपासणी केली.
- पीडित बालिकेला आरोपीच्या घराबाहेर शेवटचे पाहणारी तिची चुलत बहीण व स्वतंत्र साक्षीदार राजकुमार रेवाप्पा मेत्री यांची साक्ष खटल्यात मैलाचा दगड ठरवली.
- घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, आरोपीच्या कपड्यांवरील डाग आणि डीएनए (DNA) अहवालाची साखळी न्यायालयात बिनतोडपणे सिद्ध केली.
ॲड. प्रमोद भोकरे यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे विविध दाखले देत, आरोपीची विकृत मानसिकता आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. हा गुन्हा 'रॅरेस्ट ऑफ द रॅर' (Rarest of Rare) असल्याचे पटवून देत त्यांनी खऱ्या अर्थाने अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांच्या या प्रभावी युक्तिवादामुळेच न्यायाधीशांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली, ज्याबद्दल सध्या वकील क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये ॲड. भोकरे यांच्या कामाची मोठी प्रशंसा होत आहे.
अतीजलद तपास अन् कठोर शिक्षा
उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी केवळ १३ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ६५(२), १२७(२) सह पोक्सो (POCSO) कायद्याचे कलम ४, ५(आय), ६, ८ व १२ अन्वये दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली.
या सर्वांचे लाभले मोलाचे सहकार्य
पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली:
- प्रभारी कोर्ट पैरवी अधिकारी: सह. पो. नि. मुदस्सर शेख, श्रेणी पी.एस.आय. संजय कापुरकर
- पैरवी कर्मचारी: पो.शि. शिवाजी माळी (ब. नं. २४३२), मपोह वंदना मिसाळ (ब. नं. १२४९) व मपोकॉ. रेखा आनंदा खोत (ब. नं. २५२९) यांनी या कामी मोलाची मदत केली.
'न्याय विश्व' मत: ॲड. प्रमोद भोकरे यांच्यासारख्या अभ्यासू आणि निष्ठावंत वकिलांमुळेच सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. या निकालामुळे समाजात विकृत गुन्हेगारीला मोठा पायबंद बसेल.
Post a Comment
0Comments