वकील संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; न्यायालयीन इमारतीचे काम प्रगतीपथावर
जतकरांच्या न्यायहक्काला मिळणार नवी दिशा; प्रशस्त न्यायालयीन इमारतीची आस आता प्रत्यक्षात
जत | न्याय विश्व प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या टोकावरील आणि कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील जनतेसाठी न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड घडत आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करणाऱ्या जत तालुक्याला प्रशस्त व आधुनिक प्रशासकीय न्यायालयीन इमारत उपलब्ध करून देण्याच्या कामाला आता वेग आला असून, सदर इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे.
जत तालुक्यातील नागरिकांना आपल्या न्यायहक्कासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून न्यायालयीन कामकाजासाठी जावे लागत होते. त्यामुळे जत येथेच सक्षम, प्रशस्त आणि सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशी न्यायालयीन व्यवस्था निर्माण व्हावी, ही जतकरांची अनेक वर्षांची मागणी होती.
शासनाने जत येथे न्यायालयीन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीस मंजुरी दिल्यानंतर विविध प्रशासकीय व निधीविषयक कारणांमुळे या कामाला काही काळ विलंब झाला. मात्र, जत वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला. त्याचा सकारात्मक परिणाम आता बांधकामाच्या प्रत्यक्ष प्रगतीत दिसून येत आहे.
वकील संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
न्याय विश्व साप्ताहिकाच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सदर इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी जत वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. हणमंत बिराजदार व अॅड. ईश्वर हादीमणी यांनी इमारतीच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.
अॅड. बिराजदार यांनी सांगितले की, न्यायालयीन इमारतीचे काम विविध कारणांमुळे काही काळ अपेक्षित वेगाने पुढे जाऊ शकले नाही. मात्र, जत वकील संघटनेने या विषयात सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता बांधकामाला गती मिळाली असून काम प्रगतीपथावर सुरू आहे.
“जत तालुक्याला सुसज्ज, प्रशस्त आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त अशी प्रशासकीय न्यायालयीन इमारत मिळावी, हा वकील संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. काम यापुढेही अधिक वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी वकील संघटना सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असा विश्वास अॅड. हनुमंत बिराजदार यांनी व्यक्त केला.
Post a Comment
0Comments