अर्धशतकाहून अधिक न्यायालयीन परंपरा; तरीही जिल्हा व सत्र न्यायालयापासून आटपाडी वंचित – वकील संघटनेची आर्त हाक
आटपाडी | न्याय विश्व प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात तासगाव, कडेगाव आणि पलूस येथे नवीन न्यायालयांना मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर आटपाडी तालुक्यातील वकील आणि नागरिकांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे—"तासगावला न्याय... मग आटपाडीला कधी?"
जवळपास सहा दशकांपासून न्यायदानाची परंपरा जपणाऱ्या आटपाडीला आजही कायमस्वरूपी जिल्हा व सत्र न्यायालय मिळालेले नाही. त्यामुळे न्यायाच्या शोधात असलेल्या सामान्य नागरिकांना विट्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. न्याय मिळण्यापूर्वीच वेळ, पैसा आणि मानसिक त्रास यांची मोठी किंमत मोजावी लागते. ही वेदना केवळ वकिलांची नाही, तर हजारो पक्षकारांची आहे.
'न्याय विश्वशी बोलताना आटपाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. राम इनामदार यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, आटपाडी हा औंध संस्थानाचा अविभाज्य भाग होता. पुढे तो सातारा जिल्ह्यात आला आणि १९६८ पासून येथे न्यायालय कार्यरत आहे. एवढा मोठा इतिहास असलेल्या तालुक्याला आजही जिल्हा व सत्र न्यायालयासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे म्हटले की, विटा ते आटपाडी हे अंतर मोठे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. न्याय हा श्रीमंतांसाठी सोपा आणि गरीबांसाठी कठीण होता कामा नये. त्यामुळे आटपाडी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) आणि जिल्हा व सत्र न्यायालय तातडीने सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. विजय सावंत, सचिव ॲड. केदारनाथ भिंगे आणि सहसचिव ॲड. अश्फाक आतार यांनीही एकमुखाने सांगितले की, न्यायालयासाठी सुमारे पाच ते साडेपाच एकर जागा आधीच राखीव आहे. त्यामुळे न्यायालय उभारण्यासाठी जागेचा कोणताही अडथळा नाही. आता उरली आहे ती केवळ निर्णयाची प्रतीक्षा.
"न्याय माणसाच्या दारात पोहोचला पाहिजे; माणसाला न्यायाच्या दारात भटकावे लागू नये," अशी भावना व्यक्त करत सर्व पदाधिकाऱ्यांनी शासन आणि माननीय उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. ही केवळ न्यायालयाची मागणी नसून, आटपाडीच्या स्वाभिमानाची आणि सर्वसामान्यांच्या न्यायाच्या अधिकाराची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. बी. पाटील, ॲड. महामुनी, ॲड. मिसाळ, ॲड. दाणी, ॲड. अर्जुन वाघमारे, ॲड. सुहेल कदम, ॲड. गणेश जुगदर यांच्यासह आटपाडी वकील संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
0Comments