सुसंस्कृतपणा, आपुलकी आणि लढवय्या वृत्तीचा एक अद्भूत संगम
माणूस म्हणून जन्माला आल्यावर प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, पण काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की जो समोरच्याच्या मनावर कायमचा कोरला जातो. समाजात वावरताना अनेक चेहरे भेटतात, पण 'मीपणा'चा लवलेशही न ठेवता, प्रत्येकाला प्रेमाने जवळ करणारी माणसं विरळच! सांगली वकील संघटनेचे ज्येष्ठ आणि आदरणीय विधीज्ञ अॅड. मनोज भोसले हे अशाच मोजक्या आणि थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या बहुआयामी आणि सुसंस्कृत प्रवासाचा वेध घेणं म्हणजे एका निस्सीम आपुलकीच्या प्रवासाला उजाळा देण्यासारखं आहे.
संस्कारांची शिदोरी आणि 'दादां'ची माया
अॅड. मनोज भोसले यांच्यातील सुसंस्कृतपणा आणि दातृत्व हे त्यांना वारशानेच मिळालेले गुण आहेत. त्यांचे वडील कै. दत्ता भोसले (ज्यांना सर्वजण आदराने 'दादा' म्हणायचे) यांच्या आठवणी आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतात. माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मनोज आणि माझी भेट झाली, तेव्हापासून त्यांच्या घरातली आपुलकी मी अनुभवली आहे.
त्या काळात कधी गावाकडून एसटी चुकायची, तर कधी जेवणाचा डबा यायचा नाही. अशा वेळी दादा आणि मनोज हक्काने पाठीवर हात ठेवायचे. "अरे गावाकडून जेवण आलं का नाही? आज जेवलास का नाही?" अशी प्रेमाने विचारपूस करणारे दादा आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. मी काही बोललो नाही, तरी हक्काने चहा पाजणं, "किमान वडापाव तरी खा" म्हणून आग्रहाने भरवणं आणि सोबतीला "अभ्यास कर..." हा मोलाचा सल्ला देणं, या मायेने आम्हा पाडगावकरांना नेहमीच सावरलं.
धाडसी नेतृत्व आणि संकटसमयी धावून जाणारा मित्र
अॅड. मनोज भोसले म्हणजे केवळ कोर्टात युक्तिवाद करणारा वकील नव्हे, तर संकटात सापडलेल्या मित्रासाठी आणि सर्वसामान्यांसाठी देवासारखा धावून जाणारा माणूस आहे. माझ्या आयुष्यातील एक प्रसंग त्यांच्या धाडसाची साक्ष देतो. माझ्या मुलीच्या वैद्यकीय उपचाराच्या वेळी जेव्हा आम्ही पती-पत्नी मुंबईत होतो आणि तिथल्या प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचाराबाबत अक्षम्य हलगर्जीपणा सुरू असल्याचं निदर्शनास आलं, तेव्हा मनोज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हॉस्पिटलच्या प्रशासनाला "अत्यावश्यक सेवा का देत नाही?" म्हणून खडे बोल सुनावणारं आणि कायदेशीर भाषेत त्यांची चूक दाखवून देणारं मनोजचं ते हजरजबाबी आणि धाडसी रूप मी कधीच विसरू शकत नाही. ऐन तारुण्यात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उच्च न्यायालय आणि ग्राहक न्यायालयात जी छाप पाडली, ती त्यांच्या याच धाडसी वृत्तीमुळे!
कायद्याच्या क्षेत्रातला एक हुशार आणि प्रभावी तारा
गेल्या अनेक वर्षांपासून अॅड. मनोज भोसले जिल्हा न्यायालयात आणि विविध न्यायालयांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपली वकिली करत आहेत. कोर्टात नेमका आणि प्रभावी मुद्दा मांडण्याचं त्यांचं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे, दिलासा दिला आहे. आजही ते तितक्याच अभिमानाने आणि ताकदीने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक मंचात (National Consumer Forum) सांगलीचे प्रतिनिधित्व करतात. समाजहित हाच त्यांच्या वकिलीचा मुख्य गाभा राहिला आहे.
वारसा कर्तृत्वाचा... वारसा संस्कारांचा!
भोसले कुटुंबाची ही आदर्श परंपरा आता पुढच्या पिढीतही तितक्याच सक्षमपणे संक्रमित झाली आहे. अॅड. मनोज भोसले यांच्या कन्या कु. मानसी भोसले या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करत आहेत. लहानपणापासूनच चलाख बुद्धी असलेल्या आणि अभ्यासू वृत्तीच्या मानसीताईंनी वडिलांचा हा वकिलीचा आणि समाजसेवेचा वारसा अत्यंत गोडपणे पुढे चालवला आहे. सर्वांना आदराने वागवणं आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणं, हा जो भोसले कुटुंबाचा मूळ पिंड आहे, तो मानसीताईंच्या रूपात न्यायालयात अभिमानाने वावरताना दिसतो.
असा हा हसणारा आणि हसवणारा राजा माणूस!
हरहुन्नुरी, सर्वसामान्यांना मदत करणारा, नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवून समोरच्याची विचारपूस करणारा आणि कोणताही 'मीपणा' न ठेवता आठवणीने स्वतः फोन करून सुख-दुःखात सामील होणारा असा हा राजा माणूस आज आपल्या वयाचे एक महत्त्वाचे वर्ष पूर्ण करत आहे.
अॅड. मनोज भोसले साहेब, तुमच्यासारखं उमदं नेतृत्व आणि अथांग माया करणारं व्यक्तिमत्त्व लाभणं हे सांगलीच्या न्याय विश्वाचं भाग्य आहे. तुमच्यातील हा सुसंस्कृतपणा, हे धाडस आणि ही आपुलकी अशीच निरंतर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
'न्याय विश्व साप्ताहिक' परिवारातर्फे आणि तमाम सांगलीकरांतर्फे अॅड. मनोज भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
Post a Comment
0Comments