🚨 ब्रेकिंग न्यूज | न्याय विश्व साप्ताहिक
"उमदीला न्यायालयाची चाहूल!; प्रशासकीय हालचालींना वेग, सीमाभागाच्या आशा पल्लवित
सांगली | न्याय विश्व प्रतिनिधी
जत तालुक्यातील उमदी येथे स्वतंत्र दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती पुढे येत आहे. संबंधित न्यायालयीन व प्रशासकीय समिती या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजत असून, यासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमदी व परिसरातील नागरिकांना आजही न्यायालयीन कामकाजासाठी ५० ते ६० किलोमीटर अंतर कापून जत येथे जावे लागते. दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयात जावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वकील यांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उमदी येथे स्वतंत्र न्यायालय ही केवळ स्थानिक मागणी नसून, न्यायप्रवेश सुलभ करण्याची आवश्यकता बनली आहे.
अलीकडील काळात ग्रामीण भागात न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर उमदीच्या प्रस्तावाकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, उमदी परिसर स्वतंत्र प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित व्हावेत, तसेच भविष्यात स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दृष्टीनेही विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे उमदीचे प्रशासकीय महत्त्व वाढत असून, न्यायालय स्थापनेच्या प्रस्तावालाही बळ मिळत आहे.
उमदी येथे न्यायालय सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, न्याय त्यांच्या दारात पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल. स्थानिक वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत.
'न्याय विश्व'ला मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही काळात या बाबत निर्णायक घडामोडी होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे उमदी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष आता प्रशासकीय निर्णयाकडे लागले आहे.
न्यायालय स्थापनेच्या मागणीला वेग:
उमदी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे, यासाठी स्थानिक आमदार विशेष प्रयत्न करत असल्याचे गोपनीय रित्या कळत आहे तसेच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे निवेदने, पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींमार्फत मागणी अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
Post a Comment
0Comments