जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद अंकुश भोकरे यांनी न्यायालयासमोर मांडले प्रभावी कायदेशीर मुद्दे; प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याने न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
सांगली | न्याय विश्व प्रतिनिधी
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गाजलेल्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालय, सांगली यांनी आरोपी पलाश मुच्छाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत महत्त्वपूर्ण आदेश दिला. या प्रकरणात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद अंकुश भोकरे यांनी कायद्याच्या तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि तपासातील उपलब्ध सामग्रीच्या आधारे सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयाने आदेशात नोंदविलेल्या कारणांनुसार एफआयआरमधील आरोप, स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध तपास सामग्रीवरून प्रथमदर्शनी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा उघड होत असल्याचे नमूद करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपीसोबत आर्थिक व्यवहार झाला होता. त्यानंतर पैशांची मागणी केल्यावर सांगली-आष्टा रोडवरील टोल नाक्यावर सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शब्दांत अपमान करण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला. तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे कारणही तक्रारदाराने स्पष्ट केले होते. त्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सरकारी पक्षाने मांडलेले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे
सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद भोकरे यांनी न्यायालयासमोर पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले—
1) एफआयआर मधील आरोप विशिष्ट, स्पष्ट आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या आवश्यक घटकांना पूरक आहेत.
स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब एफआयआरला प्रथमदर्शनी पुष्टी देतात.
2) SC/ST कायद्याच्या कलम १८ आणि १८-अ नुसार प्रथमदर्शनी गुन्हा उघड होत असल्यास अटकपूर्व जामीन देण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे.
3) एफआयआर हा सर्व घटनांचा "ज्ञानकोश" नसतो. इतर तक्रारींमध्ये या घटनेचा उल्लेख नसणे हे सदर गुन्हा खोटा ठरविण्यास पुरेसे कारण ठरत नाही.
4) तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे समाधानकारक स्पष्टीकरण एफआयआर मध्येच उपलब्ध आहे.
5) अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरही आरोपीने तपासात अपेक्षित सहकार्य केले नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
6) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आधार
सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत असा युक्तिवाद केला की, अटकपूर्व जामीनाचा विचार करताना न्यायालयाने या टप्प्यावर पुराव्याचे सखोल मूल्यमापन किंवा "मिनी ट्रायल" करायची नसते. प्रथमदर्शनी एफआयआरमधून गुन्हा दिसून येतो का, एवढाच विचार करावयाचा असतो. हा कायदेशीर सिद्धांत या प्रकरणातही लागू होतो, असे न्यायालयाने स्वीकारले.
न्यायालयाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे
अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की—
सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक अपमान झाल्याचे आरोप प्रथमदर्शनी स्पष्ट आहेत.
उपलब्ध स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब एफआयआरला आधार देतात.
तक्रार नोंदविण्यास झालेल्या विलंबाचे कारण समाधानकारक आहे.
आरोपीला अंतरिम संरक्षण मिळूनही तपासात अपेक्षित सहकार्य करण्यात आले नाही.
आरोपी स्वतःच्या अटींवर तपासाची पद्धत ठरवू शकत नाही.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८ व १८-अ मधील कायदेशीर प्रतिबंध लागू होत असल्याचे नमूद केले आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
कायदेवर्तुळात चर्चेचा विषय
या आदेशामुळे SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटकपूर्व जामीन अर्जांचा विचार करताना "प्रथमदर्शनी गुन्हा" या संकल्पनेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या तत्त्वांचा अवलंब करून न्यायालयांनी कायद्याच्या उद्देशानुसार निर्णय द्यावेत, हा संदेशही या आदेशातून स्पष्टपणे पुढे आला आहे.
सरकारच्या वतीने मांडण्यात आलेल्या कायदेशीर युक्तिवादाला न्यायालयीन आदेशात प्रतिबिंब मिळाल्याची चर्चा कायदेवर्तुळात होत असून, हा निर्णय SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Post a Comment
0Comments